शाळा बंद असतानाही BMC ने विद्यार्थ्यांच्या बुटांसाठी मागवल्या ४० कोटींच्या निविदा

लॉकडाउनमुळे गेले वर्षभर शाळा बंद आहेत. तसेच येत्या काळात शाळा कधी सुरू होतील याचा कोणताही अंदाज नसताना महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी चामड्याचे आणि कॅनव्हास बूट आणि मोजे खरेदीची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी तब्बल ४० कोटींच्या निविदा मागवल्या आहेत. शाळा बंद असताना बूट-मोज्यांच्या खरेदीची घाई कशासाठी? असा सवाल केला जात आहे.

पालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील सुमारे तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दरवर्षी २७ शालेय वस्तूंचे वाटप केले जाते. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीत. यंदाच्या मार्चपासून करोनाविषयक निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील याबाबत कोणतीही शाश्वती नसतानाही पालिकेने दोन प्रकारचे बूट आणि मोजे यांच्यासाठी निविदा मागवण्याची तत्परता दाखवली आहे.

मागील महिन्यात शाळांच्या स्वच्छतेसाठी पालिकेने निविदा मागविल्या होत्या. शाळा बंद असताना या निविदा निघाल्याने राजकीय पक्षांनी प्रशासनावर टीकेचा भडिमार केल्यानंतर या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर महिनाभरातच तशाच प्रकारे निविदा मागवण्यात आल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा व भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी याबाबत पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.

पालिका शाळांमधील विद्यार्थी सध्या ऑनलाइन शिक्षणाचे धडे घेत आहे. विद्यार्थी थेट शाळेत जात नसताना बूट खरेदीची घाई कशासाठी? असा सवाल रवी राजा यांनी केला आहे. हे ४० कोटी रुपये करोनावरील उपाययोजनांसाठी वापरावेत, अशी सूचना राजा यांनी प्रशासनाला केली आहे. तर मिश्रा यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात ही १२ कोटींची खरेदी असल्याचे म्हटले असून ही रक्कम मदत म्हणून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *