लसीकरणानंतर करोनाचा धोका कमी

करोनायोद्धे म्हणून पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलेल्यांना पुन्हा करोना होण्याचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले आहे. लसीकरण केलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आदींमध्ये करोना होण्याचा टक्का अत्यंत कमी आहे, अशी कबुली महापालिका, खासगी रुग्णालये आणि पोलिस विभागानेदेखील दिली आहे.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारच्या आदेशाने आरोग्य सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. पनवेल महापालिकेच्या सहा नागरी आरोग्य केंद्रामधील आरोग्य विभागातील ३०० कर्मचारी, पनवेलमधील २०४ खासगी रुग्णालये, प्रयोगशाळा आदींमधील तीन हजार ९०० कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले होते. लसीकरणासाठी टास्कफोर्सची निर्मिती करून लसीकरण करण्यात आले. जानेवारी महिन्यात झालेल्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यानंतर लागलीच दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर म्हणून पोलिस कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले. मागील दोन महिन्यांच्या काळात करोना कमी झाल्याची चिन्हे दिसू लागताच, राज्य सरकारने पुन्हा लॉकडाउन शिथिल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. मात्र मागील १५ दिवसांत करोनारुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. करोनारुग्णांची संख्या वाढत असली तरी पहिल्या लाटेत करोनाचे बळी ठरलेले आरोग्य कर्मचारी, पोलिस यांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पनवेल महापालिकेत काम करणाऱ्या ३०० कर्मचाऱ्यांपैकी तुरळक कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली. पोलिस कर्मचाऱ्यांनाही करोना झाल्याची उदाहरणे कमी पहायला मिळत आहेत. पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय लांडगे यांना याबाबत विचारले असता, लस घेतल्यानंतर करोना होण्याचे प्रमाण कमी झाल्याबद्दल त्यांनीही दुजोरा दिला. पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे सांगितले. लसीकरणानंतर करोना झाला तरी त्याची तीव्रता अत्यंत कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल महापालिका क्षेत्रात पहिल्या दोन टप्प्यात करोना झालेल्यांना करोना होण्याची संख्या तुलनेने अत्यंत कमी आहे, याची कबुली सर्व यंत्रणा देत आहेत.

एकालाही कोरोना नाही

पनवेल शहरातील सर्वसामान्यांचे रुग्णालय म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुणे रुग्णालयाधील डॉक्टर, नर्स, वार्डबॉय, सफाई कर्मचारी अशा ७५ जणांना करोनाची लस दिली होती. त्यापैकी एकाही कर्मचाऱ्याला करोनाची लागण झालेली नाही. करोनाची लस १०० टक्के गुणकारी नसली तरी लसीमुळे करोनाचे प्रमाण कमी झाल्याचा दावा डॉ. गिरीश गुणे यांनी केला आहे. लस घेतलेल्या रुग्णांना करोना झाला तरी करोनाची लक्षणे अत्यंत सौम्य असतात, त्यामुळे त्रास होत नाही, असे पाहण्यात आल्याचे त्यांनी  सांगितले.

१६ हजार कर्मचाऱ्यांचे लसीकरण

पनवेल महापालिका क्षेत्रात १० हजार २४ आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि ६०७७ पोलिस आणि महसूल कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यातील सात कर्मचाऱ्यांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *