पुण्यात १४४ पोलिसांना करोनाचा संसर्ग

शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलिस दलातदेखील करोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. सध्या शहर पोलिस दलातील १४४ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी काही पोलिस रुग्णालयात, तर काही जण गृह विलगीकरणात आहेत. पोलिस दलात आतापर्यंत १७०० जणांना करोना संसर्ग होऊन गेला आहे.

गेल्या वर्षी करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर शहरात पोलिस दलातदेखील अनेकांना बाधा झाली होती. एका पूर्ण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी विलगीकरणात राहिले होते. त्यामुळे नंतर करोनाबाबत मोठी दक्षता घेण्यात आली. तरीही करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना करोनाची लाग होऊ लागली. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधारण १४७५ पोलिसांना करोना झाला होता. करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सक्रिय पोलिस रुग्णांची संख्या चारपर्यंत खाली आली होती. पण, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहरात करोनाचा संसर्ग वाढू लागला. त्यामुळे आतापर्यंत शहरात करोनाची लागण झालेल्या पोलिसांचा आकडा १४४पर्यंत गेला आहे. करोनामुळे १२ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिस दलात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

पुणे पोलिसांचे ९५ टक्के लसीकरण

शहर पोलिस दलातील ९५ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ८५ टक्के पोलिसांनी लशीचा एक डोस घेतला आहे, तर दहा टक्के पोलिसांनी दोन्ही डोस घेतले आहेत. काही कारणांमुळे पाच टक्के पोलिसांनी लस घेतलेली नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *