राज्यात रात्री ८ नंतर Swiggy आणि Zomato ची सेवा बंद!

महाराष्ट्रात वेगाने वाढणाऱ्या करोना रुग्णांमुळे राज्य सरकारने शनिवार-रविवार लॉकडाऊन आणि आठवड्याच्या इतर दिवशी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील इतर सर्व सेवांप्रमाणेच खाद्यसेवा देणाऱ्या Swiggy आणि Zomato यांनी देखील सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री ८ नंतर झोमॅटो किंवा स्विगीवरून आता अन्नपदार्थ मागवता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोन्ही अॅपवरून ग्राहकांना त्यासंदर्भात माहिती दिली जात असून संध्याकाळी ८ च्या आतच ऑर्डर देण्यासंदर्भात सूचना केली जात आहे. नवे निर्बंध लागू झाल्यापासून म्हणजेच ५ एप्रिलपासूनच ग्राहकांना तशा प्रकारच्या सूचना मोबाईल अॅप्लिकेशनमधून मिळू लागल्या आहेत.

रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी!

महाराष्ट्र सरकारने शनिवार-रविवार हे वीकएंडचे दिवस वगळता आठवड्याच्या इतर दिवशी संध्याकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. त्यासोबतच, दिवसाच्या इतर वेळी जमावबंदीचे देखील आदेश देण्यात आले आहेत. या काळामध्ये हॉटेल, रेस्टॉरंटमधून फक्त पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर स्विगीने नियमांचं काटेकोर पालन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. “करोनाशी लढा देण्यामध्ये राज्य सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना साथ देणं आम्ही सुरूच ठेवणार आहोत. गेल्या महिन्यातच आम्ही घोषणा केली होती की आम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये करोनासंदर्भात आणि नियमांसंदर्भात काळजी घेण्यासाठी जनजागृती करत आहोत. एक अत्यावश्यक सेवा म्हणून आम्ही आमचे डिलिव्हरी पार्टनर्स आणि ग्राहकांचं आरोग्य आणि सुरक्षा याला महत्त्व देतो. अन्नपदार्थ सुरक्षित पोहोचावेत यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत”, असं स्विगीकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *