४५ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करा

करोना लाट रोखण्यासाठी अतिशय कठोर पावले उचलण्याची ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ४५ वर्षांवरील सर्वांचे सरसकट लसीकरण करण्याची मागणी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राज्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी अधिकाधिक लसीकरण केंद्रांना परवानगी द्यावी, अशी मागणीही मुख्यमंर्त्यांनी केंद्राकडे केली.

महाराष्ट्रासह काही राज्यांत पुन्हा करोनाचे रुग्ण वाढल्याच्या पाश्र्वाभूमीवर पंतप्रधानांनी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे व मुख्यमंत्री सचिवालयातील, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाची मागणी उद्धव ठाकरे यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केली.

राज्यातील करोनाची साथ रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून, आणखी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले. राज्यात दररोज तीन लाख जणांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी ज्या केंद्रांची तयारी व क्षमता आहे अशा केंद्रांना किंवा रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी मिळावी. लसीकरणासाठी महाराष्ट्रातही अनेक खासगी रुग्णालयांनी नोंदणी केली आहे. पण त्यापैकी किती जणांची प्रत्यक्ष तयारी आहे हे तपासून लसीकरण वाढविण्यात येईल, असेही मुख्यमंर्त्यांनी सांगितले.

केंद्रीय पथकांनी वेळोवेळी दिलेले सल्ले व मार्गदर्शनाप्रमाणे राज्य करोनाची लढाई लढत आहे. मधल्या काळात तर दिवसाला २ हजार रुग्णांपेक्षाही कमी रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती. मात्र, आता काही जिल्ह्याांत ती संख्या खूप वेगाने वाढते आहे. महाराष्ट्र किंवा देशाच्या पश्चिामी भागातील राज्यांत अचानक झालेली ही मोठी वाढ संभ्रमात टाकणारी असून याविषयी तज्ज्ञ, संशोधक यांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती मुख्यमंर्त्यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर जगातल्या कानाकोपऱ्यातील सर्वच देशांत वैज्ञानिक यासंदर्भात बारकाईने लक्ष ठेवून असून या बदलाचा अभ्यास करीत आहेत, असे उत्तर मोदी यांनी दिले.

लसीच्या दोन मात्रा घेतल्यावरही विशिष्ट कालावधी उलटून गेल्यावर करोना झाल्याच्या काही घटना मुख्यमंर्त्यांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणल्या. तसेच राज्यात पुढील काळात आम्ही मोठ्या प्रमाणावर लसीकरण आणि अन्य प्रतिबंधात्कक उपाययोजना राबवण्यावर भर देणार आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात दिवसभरात २३,१७९ नवे रुग्ण

सप्टेंबरनंतरची सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ

मुंबई  : राज्यात गेल्या २४ तासांत २३,१७९ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८४ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, पुणे, नाशिक, ठाण्यासह राज्यातील सर्वच भागांमध्ये रुग्ण वाढले आहेत. सप्टेंबरनंतर राज्यात प्रथमच इतकी मोठी दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली आहे.

राज्यात ११ सप्टेंबरला सर्वाधिक २४,८८६ दैनंदिन रुग्ण आढळले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. मात्र, आता रुग्ण वाढत असून, दिवसभरात मुंबई २३७७, नाशिक शहर १४९०, पुणे शहर २६१२, पिंपरी-चिंचवड १२०६, उर्वरित पुणे जिल्हा ९०६, औरंगाबाद ९७९, नागपूर शहर २६९८, कल्याण-डोंबिवली ६३७, सातारा ३०३, अकोला शहर ३०३, बुलढाणा ५३२, वर्धा ३६० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ५२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक ३२,३५९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

‘हाफकिन’कडून लस उत्पादनाचे प्रयत्न

करोना लशीचे उत्पादन करण्यासाठी हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेडला परवानगी देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे के ली. हाफकिनमार्फत मोठ्या प्रमाणावर लस उत्पादित होऊ शकतात, याकडे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले. त्यावर पंतप्रधानांनी देशात सर्वच राज्यांत अशा प्रकारे लस उत्पादनात पुढाकार घेणाऱ्या उद्योग व संस्थांना प्रोत्साहन देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार ‘हाफकिन’ आणि भारत बायोटेक यांच्यामार्फत लस उत्पादनासाठी मुंबईत १५४ कोटींचा प्रकल्प सुरू करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

निर्णायक पावले उचला : मोदी

नवी दिल्ली : देशाच्या काही भागांमध्ये करोना संसर्ग वेगाने पसरत असून, करोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी जलद व निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यांना केले. ‘चाचणी करा, रुग्णशोध घ्या व उपचार करा’ या त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या आवश्यकतेवरही त्यांनी भर दिला. करोनास्थिती आणि लसीकरणाबाबत मोदी यांनी बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *