मृत बिबटय़ाच्या नखांची चोरी?

दुर्वेस ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गावर काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू झालेल्या बिबटय़ाची नखे अचानकपणे गायब झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत बिबटय़ा वनविभागाच्या ताब्यात असतानाही बिबटय़ाच्या चार पंज्यांमध्ये फक्त दोनच नखे शिल्लक राहिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे वन विभागावरच प्रश्न उपस्थित होत आहेत.

अपघातात बिबटय़ाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला दहिसरतर्फे मनोर वन परिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतला होता. मृत बिबटय़ाची देखरेखीची जबाबदारी दोन वन रक्षकांना देण्यात आली होती. मात्र त्यानंतर बिबटय़ाचे शवविच्छेदन करण्याआधी बिबटय़ाच्या चार पंज्यातून १८ नखे गायब झाल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. बिबटय़ाच्या शवविच्छेदन अहवालात सर्व बाबींची नोंद करण्यात आली असली तरी त्याच्या चार पंज्यांमधील नखे आहेत किंवा नाही याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

बिबटय़ाच्या चारही पंज्यांमध्ये नखे होती, शवविच्छेदना वेळी मी स्वत: उपस्थित होते, तसेच वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष करण्यात पंचनामा आल्याची माहिती दहिसरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली असली तरी सूत्रांच्या माहितीनुसार प्रत्यक्षात नखे गायब झाली असल्याने या प्रकरणाबाबत वन विभाग लपवालपवी करीत आहेत का असे सवाल उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *