आसाममधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी प्राचाराचे वारे वाहू लागले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा या सोमवारपासून दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर आहेत. आपल्या या दौऱ्यातील दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी त्यांनी सधारु टी स्टेट येथे भेट दिले. त्यांनी यावेळी चहाच्या मळ्यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तेथील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांसोबत चहाच्या पानांची तोडणी केली. दर निवडणुकीला येथील चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे मजूर हे निवडणुकीमधील मुख्य मुद्द्यांपैकी एक असतात. आजच प्रियंका यांची तेजपूरमध्ये एक प्रचारसभाही होणार आहे.
प्रियंका यांच्या दोन दिवसीय दौऱ्याचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारी प्रियंका यांनी कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये पूजा करुन दौऱ्याला सुरुवात ेकली होती. आसाममध्ये १२६ सदस्यांची विधानसभा असून येथे २७ मार्च, एक एप्रिल आणि सहा एप्रिल अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे.
