मदतकार्य पुन्हा सुरू

उत्तराखंडमध्ये हिमनदीचा कडा कोसळून चार दिवसांपूर्वी आलेल्या पुरानंतर गुरुवारी दौलीगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तपोवन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या ३० हून अधिक जणांच्या सुटकेसाठी सुरू असलेले प्रयत्न काही वेळासाठी थांबवावे लागल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३५ वर पोहोचली आहे, गोचर येथे गुरुवारी आणखी एक मृतदेह मिळाला असून रविवारपासून १६९ जण बेपत्ता आहेत.

तपोवन बोगद्यातील चिखल आणि दगडमातीचा ढिगारा काढण्यास मदतकार्य यंत्रणांनी पुन्हा सुरुवात केली आहे. दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे तर जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात चिखल आणि गाळ भरला असल्याने आत अडकलेल्या ३० हून अधिक जणांच्या सुटकेसाठी विविध मदतकार्य यंत्रणा अहोरात्र काम करीत आहेत, मात्र नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने या मदतकार्यात अडथळे निर्माण झाले आहेत.

पाण्याची पातळी ओसरल्यानंतर मदतकार्य पुन्हा सुरू करण्यात आले, मात्र सध्या छोटी पथकेच पाठविण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्यापूर्वी मदतकार्य पथकाने बोगद्याच्या सुरुवातीला असलेला चिखल काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताच मदतकार्य पथकातील कर्मचारी अवजड यंत्रांसह बोगद्याच्या बाहेर आले. खबरदारीचा उपाय म्हणून काम तात्पुरते थांबविण्यात आल्याचे चामोलीच्या जिल्हा दंडाधिकारी स्वाती भदौरिया यांनी सांगितले.

बोगद्यात ६८ मीटर आतमध्ये खोदकाम सुरू करण्यात आले आहे. बोगद्यात अडकलेल्यांसाठी प्राणवायूच्या सिलेंडरसारखी जीवरक्षक उपकरणे नेण्यावर सध्या भर आहे. बुधवापर्यंत १२० मीटपर्यंतचा गाळ उपसण्यात आला होता. बोगद्यात १८० मीटरवर काही जण अडकलेले आहेत.

बोगद्यातील तापमान २०-२५ अंश सेल्सिअस असल्याने अडकलेल्यांना काही प्रमाणात प्राणवायू उपलब्ध झाला असण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *