करोनाकाळात नागरिकांची स्वत:च्या आरोग्याबद्दल जागरूकता वाढल्याने छोटय़ा-मोठय़ा आजारांसाठी नागरिक डॉक्टरांकडे जात आहेत. याचाच फायदा घेत पुन्हा बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक छोटय़ा-मोठय़ा वस्तीत, चाळीत शेकडो बोगस डॉक्टरांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे. उपचाराच्या नावाखाली राजरोसपणे रुग्णाच्या जिवाशी खेळ सुरू असतानाही महापालिका केवळ बघ्याची भूमिका घेत आहे, याबाबत संताप व्यक्त होत आहे.
करोनाकाळात पालिकेने शहरातील वैद्यकीय सेवा-सुविधांकडे लक्ष देऊन शहरातील रुग्णालयाची संख्या वाढवली आहे. पण त्याचबरोबर शहरातील बोगस डॉक्टरांकडे मात्र दुर्लक्ष केले आहे. महापालिका स्थापनेपासून पालिकेने केवळ ६१ बोगस डॉक्टरांवर कारवाई केली आहे. या यादीत केवळ दोन रुग्णालयांचा समावेश आहे. शहरात शेकडो डॉक्टर आणि रुग्णालये कोणत्याही परवान्याशिवाय आपला धंदा करत आहेत.
पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात एक हजार ८९ दवाखाने, ३६० रुग्णालये आणि १३९ आरोग्य चिकित्सा केंद्रे नोंदणीकृत आहेत. शहरात केवळ १५ ते २० एमबीबीएस डॉक्टर आहेत. तर एमडी डॉक्टरांची संख्या ७० ते ८० आहे. यामुळे लोकांना होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांवर अवलंबून राहावे लागत आहे. नोंदणीकृत होमिओपॅथिक डॉक्टरांची संख्या ३४० असून आयुर्वेदिक डॉक्टर ४५० हून अधिक आहेत.
याबाबत पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता वाळके यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शहरातील डॉक्टरांच्या संघटनादेखील बोगस डॉक्टरांबाबत उघडपणे बोलण्यास तयार नाहीत.
