महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस मिळाले

पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राच्या वाट्याला कमी डोस आले असल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलाय. केंद्राच्या सुचनेनंतर लसीकरण केंद्राची संख्याही 511 वरुन 350 पर्यंत कमी करण्यात आल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत. आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये लस दाखल होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीबातचित केली.

राजेश टोपे म्हणाले की, “मला समाधान आहे, आपण लसीकरणासाठी आठ लाख लोकांना अपलोड केलं. त्याच्या तुलनेत लस थोडी कमी आली आहे. पण जेवढी लस आली आहे ती लस आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये निश्चितपणे पोहोचेल. तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या रात्रीपर्यंत लस पोहोचेल. तसेच 15 जानेवारीपर्यंत सर्व लसीकरण केंद्रांवर ही लस 100 टक्के पोहोचणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर लसीची साठवणूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपकरणं मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेली आहेत.” पुढे बोलताना ते म्हणाले की, “16 जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधानांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचं उद्घाटन करतील. महाराष्ट्रातील दोन रुग्णालयं एक कूपर रुग्णालय आणि दुसरं जालन्यातील जिल्हा रुग्णालय पंतप्रधानांशी यावेळी थेट संवाद साधू शकणार आहेत. अशा प्रकारे 16 जानेवारीला देशासह राज्यात लसीकरणाचं उद्घाटन केलं जाणार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *