अशुद्ध पाण्यासाठी प्रति युनिट २० रुपये दर

अशुद्ध पाण्यासाठी प्रति युनिट २० रुपये दर

कळंबोली येथील सेक्टर ५ ई येथील केएलवन आणि केएल ४ या वसाहतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मलमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नळाला पाणी आल्यानंतर किमान पंधरा मिनिटे पाणी सोडून द्यावे लागते. त्यानंतर पाणी भरले जात आहे. असे असताना सिडको प्रत्येक नळजोडणीधारकाला २० रुपये प्रति युनिट दराने पाण्याची देयके पाठवीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

कळंबोली वसाहतीमधील बैठय़ा वसाहतीसह इतर वसाहतींना सिडकोने जलमापके बसविली नव्हती. पनवेल पालिकेच्या हस्तांतरणापूर्वी ही जलमापके बसविण्यात आली असून त्या माध्यमातून पाणी शुल्क वसूल केले जात आहे. कळंबोलीतील सुमारे आठ हजार रहिवासी व वाणिज्य खातेधारकांना सिडकोतर्फे पाणीपुरवठा केला जातो. या भागाला ३२ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची गरज असताना ३० एमएलडी पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याचा तुटवडा भासतो. सिडको पाणी देयकातून महिन्याला सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल गोळा करते.

करोना संकटकाळात या बैठय़ा वसाहतीमधील अनेकांचा हातचा रोजगार गेला असताना सिडकोने पाठविलेल्या पाणी देयकांविरोधात येथील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. येथील सदनिकाधारकांना यापूर्वी महिन्याला ७५ रुपये देयक भरावे लागत होते. सध्या जलवाहिनीला जलमापके बसविल्याने महिन्याला तीनशे रुपयांहून अधिक पाणी शुल्क भरावे लागत आहे. वेळीच देयके न भरल्यास दंडाची रक्कम वर्षांला १६ टक्के आकारले जात आहेत. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मलमिश्रित पाण्याचे शुल्क व त्यावरील दंडव्याज द्यावा लागत असल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी मागील दोन वर्षांपासून मलमिश्रित पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वासन देत आहेत. मात्र प्रत्यक्षात याबाबत काहीही झालेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *