वसई-विरारमधील शाळा सोमवारपासून सुरू

वसई-विरारमधील शाळा सोमवारपासून सुरू

करोनाच्या संसर्गामुळे शहरातील या शाळा अनिश्चित काळासाठी बंद होत्या. २३ नोव्हेंबरपासून राज्य शासनाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती; परंतु शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावर सोपविण्यात आला होता. पालघर जिल्ह्यासह वसई-विरार शहरांतील करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी पालघर जिल्ह्यातील पाच हजार लोकसंख्येपेक्षा कमी गावांमध्ये १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. तसेच ८ डिसेंबरनंतर पाच हजार लोकसंख्येपेक्षा अधिक गावांमधील शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबपर्यंत सुरू करू नयेत अशा सूचना केल्या होत्या.

वसई-विरार शहरातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शाळा येत्या ४ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. महापालिका आयुक्तांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. शहरालगतच्या मीरा-भाईंदर, ठाणे आणि मुंबईतील शाळा सुरू नसताना वसईत शाळा सुरू केल्या जात असल्याबद्दल पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सांगितले.

वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी शहरातील शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या दिलेल्या परवानगीनुसारच वसई तालुक्यातील शाळांना पूर्वतयारीसाठीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. वसईत ९ ते १२ पर्यंत एकूण ३१६ शाळा असून यामध्ये १ लाख ८ हजार ३६८ विद्यार्थी शिकत आहेत. त्यांना शिकविण्यासाठी ४ हजार ४०६ शिक्षक-कर्मचारी आहेत. त्यासाठी शिक्षकांच्या करोना चाचण्या व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या असल्याचे तालुका गटशिक्षणाधिकारी माधवी तांडेल यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *