पायातील चपलांमुळं ‘तो’ पोलीस तुरुंगात गेला

गाडी अडवून दारूचा बॉक्स आणि पाच हजार रुपये घेणाऱ्या एका तोतया पोलिसाची बनवेगिरी चपलांमुळे उघड झाली आहे. स्वतःला पोलिस म्हणवतो तर पायात चपला कशा, असा संशय तक्रारदाराला आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी या बोगस पोलिसाला अटक केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका पोलिस कॉन्स्टेबलही गुंतला असल्याची माहिती पुढे आली आहे.

कळवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी हा प्रकार घडला. पोलिसांच्या पेहरावात असलेल्या तोतया पोलिसाने एका गाडीला अडवले. गाडीमध्ये दारूचा बॉक्स असल्याने तुम्हाला पोलिस उपआयुक्तांकडे जावे लागेल, अशा पद्धतीने हा तोतया पोलिस बोलू लागला. आम्ही पोलिस आहे, असेही तो म्हणाला. त्यानंतर त्याने गाडीतून दारूचा बॉक्स घेतला, शिवाय पाच हजार रुपयेही उकळले. त्यानंतर तोतया पोलिस निघून गेला. मात्र, तक्रारदाराला या पोलिसाच्या चपलांबाबत संशय आल्याने त्याने त्वरित कळवा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. कळवा पोलिसांनी तोतया पोलिसाच्या मुसक्या आवळल्या. ४० वर्षांचा हा आरोपी भिवंडीमध्ये राहत असून त्याच्याकडून दारूचा बॉक्स आणि पैसे हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच तो गाडीमध्ये पोलिस अशी पाटी लावत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या प्रकरणामध्ये एका खराखुरा पोलिस कॉन्स्टेबल गुंतला असल्याची बाब समोर आली आहे. गुन्हा घडला त्यावेळी दोघेही त्याठिकाणी होते. हा कॉन्स्टेबल मुंबईचा असल्याचेही पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *