वर्क फ्रॉम होममुळे मुंबईकरांचा आजार बळावतोय; बैठ्या कामामुळे 40 वर्षीय व्यक्तीच्या मणक्यात गाठ

लॉकडाऊनमुळे सध्या अनेक लोक एकीकडे वर्क फ्रॉम होम करण्यात यशस्वी होत असताना दुसरीकडे मात्र शारीरिक तंदुरुस्ती राखण्यात अपयशी ठरत आहेत. बराच वेळ एकाच ठिकाणी बसून सतत काम करावे लागत असल्याने पाठदुखीची समस्या बळावू लागलीय. याचा प्रत्यय नुकताच आलायं. लॉकडाऊनच्या या कालावधीत अधिक तास बसून काम करावे लागत असल्याने मुंबईतील एका व्यक्तीच्या मणक्यात गाठ तयार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबईतील एका ४० वर्षीय व्यक्तीच्या पाठीच्या मणक्यातून 3.5 सेंटिमीटरचा ट्यूमर (गाठ) काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. हा रुग्ण कित्येक महिने पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. मीरारोड येथील वोक्हार्ड रूग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

जास्त वेळ बसून काम केल्याने पाठीचं दुखणं

भूपेश अंकोलेकर (वय 40) असे या रुग्णाचे नाव असून ते मुंबईत राहणारे आहेत. ही व्यक्ती व्यवसायाने अभियंता आहे. बैठ्या जीवनशैलीमुळे अनेक महिन्यांपासून त्यांना पाठदुखीची समस्या जाणवत होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये घरीच बसून काम करावे लागत असल्याने पाठीचे दुखणे अधिकच वाढू लागले. दुखणं असह्य झाल्याने कुटुंबियांनी त्यांना मे च्या पहिल्या आठवड्यात मीरारोड येथील वोक्हार्ट रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या रुग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाले. पाठीच्या दुखण्याचे कारण जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा एक्स-रे आणि एमआरआय चाचणी करण्यात आली. या वैद्यकीय तपासणीत या व्यक्तीच्या पाठीच्या कण्यात गाठ असल्याचं निदान झालं. ही गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढणे गरजेचं होते. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया करुन पाठीच्या मणक्यातून गाठ काढली. ही गाठ 3.5 सेंटिमीटर इतकी मोठी होती.
यासंदर्भात बोलताना मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील तज्ज्ञ सल्लागार आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. गिरीश भालेराव म्हणाले की, “पाठीच्या कण्यातील ही गाठ हाडाच्या आत चिटकून होती. मज्जातंतूला नुकसान होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होतं. परंतु, डॉक्टरांनी हे आव्हान स्विकारुन मायक्रोस्क्रोपीद्वारे (दुर्बिणी) प्रक्रिया करून पाठीच्या मणक्यातील ही गाठ यशस्वीरित्या गाठली. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला पाठीच्या दुखण्यातून कायमस्वरुपी सुटका मिळाली आहे.

वोक्हार्ट रुग्णालयातील कन्सल्टंट न्यूरोसर्जन डॉ. अश्विन बोरकर म्हणाले की, “पाठीच्या कण्यातून गाठ काढणे ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असते. साधारणतः चार तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनुसार रूग्ण शुद्धीवर आल्यावर कुठल्याही प्रकारची वेदना जाणवत नाही. दोन तासांनंतर तो दैनंदिन आयुष्य जगू शकतो. या रूग्णाला शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी घरी सोडण्यात आले आहे. आता या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून तो नियमित कामे करू लागला आहे.

रूग्ण भूपेश अंकोलेकर म्हणाले की, “पाठीच्या मणक्यात ट्यूमर (गाठ) असल्याचे निदान झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण होते. शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढणे हा एकच पर्याय होता. त्यानुसार डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढली. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आता मला या पाठीच्या दुखण्यातून सुटका मिळाली आहे. आता मी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगू शकतोय.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *