पश्चिम बंगालमध्ये 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात लागू असलेला लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात त्यांनी बुधवारी घोषणा केली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 30 जून रोजी संपणार आहे.

राज्य सचिवालयासमोर सभागृहात सर्वपक्षीय बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘नेत्यांमध्ये विचारांची भिन्नता दिसून आली, परंतु, शेवटी निर्णय घेण्यात आला की, लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथीलता देण्यासोबत त्याचा कालावधी 30 जुलैपर्यंत वाढवण्यात यावा.’

पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसचे 445 नवे रुग्ण

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची बाधा झालेल्या 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 591 वर पोहोचला आहे. याचसोबत राज्यात कोविड-19चे 445 नवे रुग्ण समोर आले आहेत. नव्या रुग्णांसोबतच राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 15173 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी उपचारानंतर 484 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत राज्यात 9702 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात डिस्चार्ज रेट 63.94 टक्क्यांवर

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालचा डिस्चार्ज रेट 63.94 टक्के इतका आहे. 23 जुलैपर्यंत एकूण 4,20,277 टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच 24 जून रोजी 9,489 टेस्ट करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 4,29,766 टेस्ट करण्यात आल्या आहेत. प्रति दहा लाख लोकांमागे 4,775 टेस्ट केल्या जात आहेत.

आतापर्यंत शासकीय क्वॉरंटाइनमधून 92189 लोकांना रिलीज करण्यात आलं

पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 582 सरकारी क्वॉरंटाइन सेंटर्स आहेत आणि यामध्ये 8585 लोकांना सध्या क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 92189 लोकांना सरकारी क्वॉरंटाइनमधून रिलीज करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *