सराईत मोबाईल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, एका दुचाकीसह 21 मोबाईल हस्तगत

नागरिकांचे लक्ष विचलित करून मोबाईल पळवणाऱ्या दोघा चोरट्यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून एका दुचाकीसह वेगवेगळ्या कंपन्यांचे 21 मोबाईल असा एक लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मनोज यल्लप्पा मुदगल (वय 39), धर्मा तीम्मा भद्रावती (वय 26) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुखसागर परिसरातील एक व्यक्ती सामान खरेदी करण्यासाठी रस्त्याने पायी निघाला होता. यावेळी वर नमूद केलेल्या आरोपींनी त्यांचे लक्ष विचलित करून त्यांचा मोबाईल पळवला. हे लक्षात येताच शिवाजी गायकवाड यांनी आरडाओरडा केला. यावेळी त्याच परिसरात बिबवेवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्त घालत होते. त्यांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली.

पोलीस स्टेशनमध्ये आणून त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा मोबाईल चोरल्याचे उघड झाले. त्यांच्या ताब्यातून 21 मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एक लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी अजूनही काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *