सात वर्षांच्या मुलीची हत्या

दक्षिण मुंबईतील डोंगरी परिसरात एका सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. मूळचा उत्तर प्रदेशच्या असलेल्या या मुलीच्या परिचयातील २२ वर्षांच्या नराधमाला डोंगरी पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे. १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचे अपहरण करून या नराधमाने तिचा मृतदेह रेल्वे रुळानजीक कचऱ्यात फेकून दिल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेमुळे डोंगरी परिसरात खळबळ उडाली आहे.

डोंगरी परिसरात राहणारी स्वीटी (बदललेले नाव) ३० मे रात्री साडेनऊ पासून बेपत्ता होती. शोध घेऊन सापडत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी डोंगरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. डोंगरी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी स्वीटी राहत असलेल्या परिसरातील अनेकांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब घेतले. सीसीटीव्ही; तसेच तिच्या परिचयातील व्यक्तींचीही चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान स्वीटीला ओळखणाऱ्या आणि केटरिंग व्यवसायात असलेल्या २२ वर्षांच्या तरुणावर संशय बळावला. मात्र, हा तरुण ६ जून रोजी श्रमिक गाड्यांतून उत्तर प्रदेश येथे निघून गेला होता. पोलिसांनी या तरुणाला संपर्क करून जबाब नोंदवायचे कारण सांगून मुंबईत बोलावले. याआधी एकदा जबाब घेऊन पोलिसांनी सोडले होते त्यामुळे या वेळीही सोडून देतील असे समजून हा तरुण मुंबईत आला.

डोंगरी पोलिसांनी रविवारी या तरुणाला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. केटरिंगमध्ये काम करीत असल्याने हा तरुण स्वीटीला नेहमी बिर्याणी देत असे. ३० मे रोजी रात्री घराबाहेर खेळणाऱ्या स्वीटीला बिर्याणीचे आमिष देऊन तिला लोखंडवाला रेल्वे पुलावर नेले. या ठिकाणी स्वीटीवर लैंगिक अत्याचार करून तिला पुलावरून फेकून दिले. उंचावरून पडल्याने स्वीटीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कुणाच्या हाती लागू नये यासाठी या नराधमाने जवळच असलेल्या कचऱ्याच्या ढिगात स्वीटीला फेकून दिले. अटक केल्यानंतर या नराधमाने दडवलेल्या ठिकाणाहून स्वीटीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या नराधमाला न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *