येरवडा जेलमधील बाथरुमच्या खिडकीतून २ कैदी पसार

करोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी शनिवारी पहाटे पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघे पळाले. त्यामुळं कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या कैद्यांचा शोध घेतला जात आहे.
हर्षद सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) व आकाश बाबूलाल पवार (वय २४ रा. काळेवाडी, पिंपरी) अशी कारागृहातून पसार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
येरवडा येथील शासकीय वसतिगृहात तात्पुरते कारागृह तयार केले आहे. या ठिकाणी कैदी ठेवण्यात येत आहेत. त्या ठिकाणी या दोन कैद्यांनाही ठेवण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघांनीही पळ काढला. या घटनेची माहिती मिळतात येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कैद्यांचा शोध सुरू केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील बाळासाहेब गोविंद कांबळे (वय ५०) या कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत बंदोबस्तावरील पोलिसानं त्याला पकडलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *