नैऋत्य मोसमी वारे आता संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू व्यापताना दिसत आहे. पुढच्या ४८ तासात मान्सून पूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान संस्था म्हणजेच आयएमडीने व्यक्त केला आहे. आयएमडीने ठाण्यासाठी शनिवारी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.
शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात जून महिन्यातील पहिल्या १२ दिवसांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाचपट जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुंबईसह परिसराला तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतांश भाग मान्सूनने याअगोदरच व्यापला आहे. सोलापूरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि कोकणमध्ये मान्सून दाखल झाला आहे.
