कोरोनाचे संकट वाढत असताना चिंता करणारी बातमी पुढे आली आहे. राज्यात रक्तसाठा कमी झाला आहे. राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपुरवठा, पीपीई कीट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी उत्पादकांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती. त्यानंतर त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, हाफकिन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचाराचा भाग म्हणून रक्ताची आवश्यकता नसली तरी अशा व्यक्तीला जर ॲनेमिया किंवा इतर आजार असतील अशा परिस्थितीत त्याला रक्ताची आवश्यकता निकड भासू शकते. तसेच इतर शस्त्रक्रिया, बाळंतपण आणि थॅलेसेमिया, काही कॅन्सर सारख्या आजारपणासाठी रक्ताची आवश्यकता असते, असे ते म्हणालेत. त्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
