वडगाव शेरी मतदारसंघातील विद्यमान नगरसेवकाच्या पंचवीस वर्षीय मुलाला आणि कुटुंबातील नऊ वर्षांच्या मुलीला करोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेवकाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी खासगी रुग्णालयात चाचणी केली असता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काही दिवसांपूर्वीच याच प्रभागातील एका विद्यमान नगरसेविकेसह आणि तिच्या कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचा प्रकार समोर आला होता.
वडगाव शेरी मतदारसंघातील विद्यमान नगरसेवक आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या काही दिवसांपासून संबंधित प्रभागातील नागरिकांना मोफत धान्य, जीवनावश्यक वस्तूंचे घरोघरी वितरण करीत आहे. या दरम्यान नगरसेवकाच्या पंचवीस वर्षीय मुलाला ताप येऊ लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची करोना चाचणी करण्यात आल्यावर अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर नगरसेवकाच्या भावाच्या मुलीला त्रास होऊ लागल्यावर तिचीही चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. सध्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. यानंतर नगरसेवकाच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कुटुंबातील सर्वांना ‘होम क्वारंटाइन’ होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
