घोटी सिन्नर महामार्गावर सकाळी परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. भिवंडीकडून ओरिसाकडे ५३ प्रवाशांना घेऊन हा ट्रक जात होता. ट्रक अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताने पुन्हा एकदा मजुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घोटी सिन्नर हायवेवर कॉलनी फाटा परिसरात हा अपघात घडला. या अपघातात तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला आहे. या कामगारांकडून प्रत्येकी चार हजार रुपये असे साधारण दोन लाख रुपये भाडे ट्रक मालकाने आकारले होते. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. या लॉकडाऊनमुळे मजुरांची प्रचंड प्रमाणात गैरसोय झाली आहे.
अपघात झाल्यानंतर गाडीचा चालक पसार झाला असून क्लिनरला मजुरांनी पकडून ठेवलं आहे. नाशिक रोडवरील पिंपळ गावाजवळ अपघात झाल्यानंतर गावातील सरपंचांनी या मजुरांना मदत केली आहे. मजुरांना न्याहारी आणि पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. ट्रकचा अपघात झाल्यामुळे आणि सोबतचे पैसे ट्रक मालकाला दिल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न मजुरांसमोर निर्माण झाला आहे.
