मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर आज, रविवारी मालगाडीचे डबे घसरले. त्यामुळं रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मालगाडी रवाना होईपर्यंत मालवाहतूक बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावरील दिवाण खवटी ते खेड या दरम्यान मालगाडीचे चार डबे घसरले. त्यामुळं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मालगाडी रेल्वे रुळांवरून हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ही मालगाडी पुढे रवाना होईपर्यंत मालवाहतूक बंद राहणार आहे, अशी माहिती समजते.

कोकण रेल्वे मार्गावर सध्या प्रवासी वाहतूक बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि साहित्य पुरविण्यासाठी मालगाड्या सोडण्यात येत आहेत. करोनामुळे बंद असलेली प्रवासी रेल्वे १५ मे नंतर कदाचित सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. असं असतानाच, आज दुपारच्या सुमारास मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले. त्यामुळं वाहतूक ठप्प झाली. कोकण रेल्वेचे विशेष आपात्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले. डबे रुळावरून हटवण्याचे काम हाती घेतले. वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब लागू शकतो, असं सांगण्यात येत असून, डबे हटवून मालगाडी पुढे रवाना होईपर्यत मालवाहतूक सेवाही बंद राहील, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *