अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये वाढ

Coronavirus  कोरोना व्हायरस अर्थात कोविड 19च्या वाढत्या प्रादुर्भावामुळं देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळ वाढवण्यात आला. त्याच धर्तीवर आता पॅरोलवर कारागृहातून बाहेर असणाऱ्या गँगस्टर, कुख्यात डॉन अरुण गवळी याच्या पॅरोलला मुदतवाढ देण्यात आल्याचं वृत्त समोर येत आहे.

शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून गवळीची पॅरोल मुदवाढीसंदर्भातील याचिका स्वीकारली. पत्नीच्या आजारपणाच्या कारणामुळं अरुण गवळी जवळपास ४५ दिवसांसाठी पॅरोलवर कारागृहातून बाहेर होता. एप्रिल महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २७ एप्रिलला त्याने कारागृहात हजर होणं अपेक्षित होतं.

यादरम्यानच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढला. ज्यानंतर गवळीच्या पॅरोलला मुदतवाढ देण्यात आली असून, १० मे रोजीची मुदत त्याला देण्यात आली होती. पण, पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळं आता आणखी एकदा त्याच्या पॅरोलला मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मुदतवाढीची ही तारीख आता थेट २४ मे पर्यंत पोहोचली आहे. शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या गवळीच्या पॅरोलमध्ये दुसऱ्यांचा वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, एकिकडे अरुण गवळीच्या पॅरोलची चर्चा असतानाच दुसरीकडे त्याचं कुटुंब आणखी एका कारणामुळं चर्चेचा विषय ठरत आहे. ही चर्चा आहे, त्याच्या मुलीच्या छोटेखानी तरीही तितक्याच खास विवाहसोहळ्याचं.अभिनेता अक्षय वाघमारे याच्यासह अरुण गवळीची मुलगी योगिता हिनं लग्नगाठ बांधली. अतिशय धुमधडाक्यात पार पडण्यासाठी सज्ज असणारा हा सोहळा दगडी चाळीतच पार पडला. यावेळी विवाहसोहळ्यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियमही पाळले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *