मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्याला करोनाची लागण झाली. या कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांनाही लागण झाल्याचे समजते. या कैद्याबरोबर आणखी दीडशे कैदी कारागृहातील कक्षात बंद होते. त्यामुळे कारागृह विभागासह गृहमंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतल्याचे समजते.
आर्थर रोड कारागृहात आठशे कैदी ठेवण्याची क्षमता आहे. टाळेबंदीआधी येथे सुमारे ३४०० कैदी होते. करोनाचा प्रादुर्भाव वाढणार हे लक्षात घेऊन मुंबई विभागातील आर्थर रोड, भायखळा (महिला), ठाणे, कल्याण येथील कारागृहातील काही कैदी तळोजा कारागृहात हलविण्यात आले.
तळोजा वगळता मुंबई विभागातील कारागृहांमध्ये कैदी स्वीकारणे बंद केले गेले. आर्थर रोड कारागृहाचे अधीक्षक नितीन वायचळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कारागृहात फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहने येत होती. साफसफाई आणि निर्जंतुकीकरणासाठी महापालिका कर्मचारी येत होते. कारागृहासमोरच कस्तुरबा रुग्णालय आहे. येथे २४ तास करोनाबाधित, संशयित रुग्णांचा राबता असतो. या पाश्र्वभूमीवर एका कै द्याला लागण झाली आहे. या कैद्याला हाताळणाऱ्या दोन शिपायांना भायखळा येथील महिला कारागृहातील विश्रामगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र पुढे त्यांनाही बाधा झाली. त्यामुळे विश्रामगृह प्रतिबंधित केल्याचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी सांगितले.
एक कैदी, दोन शिपायांना लागण झाल्याचे स्पष्ट होताच मंगळवारी जेजे रुग्णालयाच्या पथकाने कारागृहातील दीडशे कैदी आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चाचणीसाठी नमुने घेतले. चाचणी अहवाल गुरुवारी अपेक्षित आहेत. संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रत्येक कारागृहात पुरेशी काळजी घेतली जात होती. आता आणखी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या जातील.
