विशाखापट्टणम: पॉलिमर कंपनीत झालेल्या विषारी गॅस गळतीमुळे ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ८ वर्षांच्या एका मुलीसह दोन जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एकूण ५०० जणांना या गॅस गळतीची बाधा झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी २० जण गंभीर आहेत. या विषारी वायूच्या गळतीमुळे तीन किमीच्या परिसरावर परिणाम झाला असून आतापर्यंत एकूण ५ गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी घडली.
आर. आर. वेंकटपुरम येथे असलेल्या विशाखा एल. जी. पॉलिमर कंपनीत विषारी वायूची गळती झाली आहे. या विषारी वायूमुळे शेकडो लोकांना डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
२० लोक गंभीर असून यात बहुतेक जेष्ठ नागरिक आहेत. काही लोकांना गोपालपुरमच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक लोकांच्या उपचारासाठी रुग्णालयात १५०० ते २००० बेडची व्यवस्था करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याबाबत कळू शकलेले नाही. वायूगळतीची माहिती मिळताच विशाखापट्टणमचे जिल्हाधिकारी विनय चंद घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन तासांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवले गेले असे चंद यांनी सांगितले. वायू गळतीच्या परिसरात लोकांना न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
एल. जी. पॉलीमर्स इंडस्ट्रीची स्थापना सन १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलीमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. सन १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर ही कंपनी एल.जी. पॉलिमर्स इंडस्ट्री या नावाने ओळखू लागली.
