जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. मागील चोवीस तासांत देशभरात कोरनाने 47 जणांचा बळी घेतला असून, 1 हजार 336 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर देशातील एकूण करोनाची रुग्ण संख्या 18 हजार 336 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 14 हजार 759, रुग्णालायतून उपचारानंतर घरी पाठण्यात आलेले 3 हजार 252 व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 590 जणांचा समावेश आहे.
करोना व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रूग्णांची संख्या दररोज वाढतच आहे. देशातील एकूण रूग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज रूग्णांच्या संखेत वाढ होत असतानाच एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने (आयसीएमआर) दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 80 टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत. आयसीएमआरच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, करोना सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. पण सकारात्मक अहवाल आढळलेल्या जवळपास 80 टक्के रूग्णांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे करोना बाधितांचा शोध घेऊन उपचार करणे कठीण जात आहे.
जगात करोनाने आतापर्यंत १,६६१२२ बळी घेतले असून एकूण रुग्णांची संख्या २४,२६७८९ झाली आहे. एकूण १९३ देशात विषाणूचा प्रसार झाला असून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ६३६७०२ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटना व एएफपी यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही संख्या देण्यात आली असून संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या जास्तच असण्याची शक्यता आहे.
