देशात करोना व्हायरसचे आतापर्यंत १३८ रुग्ण सापडले आहेत. गेल्या २४ तासांत २३ नवे रुग्ण सापडले आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मंगळवारी दुबईहून परतलेल्या ६४ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने त्याच टॅक्सीमधून प्रवास केला होता जिच्यामुळे पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. देशात सर्वात जास्त करोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात करोना रुग्णांची संख्या ४२ वर पोहोचली आहे.
१ मार्च रोजी पुण्यात स्थायिक असणारे पती-पत्नी आणि मुलगी दुबईहून मुंबईत परतले होते. आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन त्यांनी पुण्यासाठी टॅक्सी बूक केली होती. पती-पत्नी आणि मुलगी यांना नंतर करोना व्हायरसची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं होतं. यानंतर त्याच टॅक्सीत प्रवास करणाऱ्या अन्य दोन लोकांनी आणि चालकालाही करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. अशा पद्धतीने एकाच टॅक्सीतून प्रवास केल्याने पाच जणांना करोनाची लागण झाली आहे.
