दुचाकीवरून भरधाव येत एकट्यादुकट्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरणाऱ्या आरोपीस वडाळा टीटी पोलिसांनी अटक केली आहे. शोएब मतिन (२३) असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात मुंबईसह नवी मुंबईत तक्रारींची नोंद आहे.
प्रतीक्षानगर येथील पालिका शाळेजवळ आपल्या मुलाला आणण्यासाठी थांबलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. ही महिला एकटीच असल्याचे पाहून आरोपीने भरधाव दुचाकीवरून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटली. त्याचा तपास करताना वडाळा टीटी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. त्या फुटेजमध्ये मतिन संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे आढळून आले. त्यावर पोलिस पथकाने मतिनचा शोध घेण्यास सुरुवात केली. यातून चेंबुरमधील चिता कॅम्प येथून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती मतिनने केवळ मुंबईतच नव्हे तर, नवी मुंबईतही याच पद्धतीने सोनसाखळ्या लुटल्याचे उघड झाले.
