रक्षकच झाले भक्षक, पोलीस कर्मचाऱ्याकडून विद्यार्थिनीची छेड

विद्यापीठ परिसरात गर्ल्स हॉस्टेल समोर पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थिनींची छेड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. नितीन केंद्रे असं आरोपी पोलीस कर्मचा-याचं नाव आहे. विद्यार्थ्यांनी हटकले असता पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना ही दमदाटी केली. आरोपी विरोधात सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरु आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील हा संपूर्ण प्रकार घडला. विद्यार्थिनीची प्रकृती ठीक नसल्याने ती दवाखान्यात जात असताना आरोपीने तिची छेड काढली. हा प्रकार सुरु असताना काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी धाव घेतली. पण या विद्यार्थ्यांनाच दमदाटी करण्यात आली. दुसरीकडे आरोपी मात्र बिनधास्तपणे वावरत होता. या घटनेविरोधात नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याने न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *