गणवेश न घालणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

मुंबई महापालिकेच्या विविध विभागात काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना गणवेश आहे अशा कर्मचाऱ्यांनी कामावर येताना आपला गणवेश घातला नाही तसेच ओळखपत्र गळ्यात घातले नाही, तर यापुढे त्यांचा पगार कापण्यात येणार आहे. तसेच गणवेश न घालता आलेल्या कर्मचाऱ्याला विनावेतन रजेबाबतचा ज्ञाप देण्यात येणार आहे. पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रक काढले आहे.

मुंबई महापालिकेत अग्निशामक दलाचे जवान, आरोग्य विभागातील परिचारिका आणि वॉर्डबॉय तसेच आया, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कामगार, शिपाई, सुरक्षारक्षक यांना ठरावीक गणवेश दिलेले आहेत. मात्र अग्निशामक दलाचे जवान आणि परिचारिका वगळता काही कर्मचारी हे कामावर असताना गणवेश घालतच नसल्याच्या तक्रारी अनेकदा येतात.

विशेषत रुग्णालयात वॉर्डबॉय हे काम टाळण्यासाठी गणवेश घालत नाहीत. आपली ओळख लपवण्यासाठी ते ओळखपत्रही घालत नाहीत. त्यामुळे पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने गणवेश परिधान करण्याबाबत परिपत्रक काढले आहे. ज्या खाते, विभाग व रुग्णालयातील कर्मचारी कामावर असताना गणवेश परिधान करीत नसतील किंवा ओळखपत्र गळ्यात घालत नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्यामुळे प्रशासनाने आता हे नवीन परिपत्रक काढले आहे.

आधी चांगले गणवेश द्या

पालिकेने आधी कर्मचाऱ्यांना चांगले गणवेश वेळेत द्यावेत. आगीशी दोन हात करणाऱ्या जवानांसाठी अग्निरोधक गणवेश महत्त्वाच आहे. अग्निशामक दलातील जवानांना गेल्या तीन वर्षांत नवीन गणवेशच दिलेले नाहीत. मग त्यांनी काय स्वतचे पैसे खर्च करून गणवेश घालायचे का? काही कर्मचाऱ्यांना गणवेश दिला जातो, काहींना कापड दिले जाते, तर काहींना पैसे दिले जातात. मात्र ते कधीच वेळेवर दिले जात नाहीत. तयार गणवेश हे अनेकदा मापाचे नसतात. त्यामुळे कर्मचारी गणवेश वापरत नाहीत. प्रशासनाने या गोष्टीकडेही लक्ष द्यावे, असे मुंबई मनपा कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *