मोबाइलची लाइट डोळ्यावर मारल्याने चौथ्या मजल्यावरून ढकलले; तरुणाचा मृत्यू

मोबाइलच्या बॅटरीची लाइट डोळ्यावर मारल्याने संतापलेल्या माथेफिरूने तरूणाला चौथ्या मजल्यावरून ढकलल्याची धक्कादायक घटना मालाडच्या कुरार परिसरात घडली. या घटनेत अभिषेक चौहान या तरुणाचा मृत्यू झाला. कुरार पोलिसांनी अभिषेकला ढकलणाऱ्या अविचंद्र यादव (२४) याला अटक केली आहे.

कुरारच्या पठाणवाडीमध्ये शीतल तपोवन बिल्डिंग या इमारतीचे काम सुरू असून अभिषेक आणि अविचंद्र दोघेही याठिकाणी काम करीत होते. शुक्रवारी रात्री अभिषेक याने मोबाइलच्या बॅटरीची लाइट अविचंद्र याच्या डोळ्यावर मारली. डोळ्यांना त्रास होत असल्याने लाइट मारू नकोस असे अविचंद्र वारंवार सांगत होता. तरीही अभिषेक ऐकत नसल्याने यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. भांडणाचे पर्यवसन हाणामारीत झाले आणि त्यातूनच संतापलेल्या अविचंद्र याने अभिषेकला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. अभिषेक लिफ्टच्या डक्टमध्ये कोसळला. उंचावरून पडल्याने डोक्याला जबर मार बसला आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून अविचंद्र याला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *