शाळेतील एका विद्यार्थ्यांच्या वडिलांची करोना चाचणी सकारात्मक आल्याने दोन खासगी शाळातील वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन शाळांनी कामकाज बंद ठेवण्याचे संदेश पालकांना पाठवले असून केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार करोनाचे दोन नवीन रुग्ण सापडले असून त्यात एक दिल्लीतील आहे.
दिल्लीतील एका व्यक्तीच्या मुलाची शाळा बंद ठेवण्यात येणार असून तो मुलगा प्राथमिक वर्गाचा आहे. हा मुलगा ज्या शाळेत जातो, ती आता ४ ते ६ मार्चदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. पालकांनी या मुलाचा वाढदिवस साजरा करून मेजवानी ठेवली होती, त्या वेळी उपस्थित मुलांना करोनाचा संसर्ग झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. शाळेतील पाच मुलांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले आहेत. अंतर्गत परीक्षा अपरिहार्य कारणामुळे लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे शाळेने म्हटले असून दहावी बारावीच्या परीक्षांवर या निर्णयाचा कुठलाही परिणाम होणार नाही असे कळवण्यात आले आहे.
दुसऱ्या एका शाळेनेही वर्ग बंद ठेवण्याचे जाहीर केले, ९ मार्चपर्यंत ही शाळा बंद राहणार असून परिसर र्निजतुक करण्यात येणार आहे. दोन्ही शाळांमध्ये धुरळणी करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या पथकाचे प्रमुख असलेले नॉइडाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी यापैकी एका शाळेत सकाळी गेले होते. दरम्यान दिल्लीतील संबंधित एका करोनाग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबीयांनाही चाचणीसाठी सफरदरजंग रुग्णालयात नेले असून त्यांच्यात लक्षणे दिसली होती. इतर काही नातेवाइकांना घरातच वेगळे राहण्यास सांगण्यात आले आहे. या व्यक्तीसाठी काम करणारा लेखापाल मयूर विहारमध्ये राहतो. त्याला चाचण्यांसाठी दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. मयूर विहार येथील रहिवाशाने मुलाचा वाढदिवस साजरा केला होता. त्या वेळी अनेक लोक त्याच्या संपर्कात आले होते, असे नॉइडाचे आरोग्य अधिकारी अनुराग भार्गव यांनी म्हटले आहे. पाच विद्यार्थ्यांचे नमुने एनसीडीसी म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत. शाळा रिकामी करण्यात आली असून र्निजतुकीकरण करण्यात येत आहे.
