करोना व्हायरसची धास्ती आता भारतातही पसरलीय. मंगळवारी दिल्लीत करोनाची लागण झालेला आणखीन नागरिक सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली. हा व्यक्ती ज्यांच्या कुणाच्या संपर्कात आला त्यांची सगळ्यांची तपासणी सुरू आहे. या करोना पॉझिटिव्ह व्यक्तीची दोन मुलं नोएडातल्या एका शाळेत शिकतात. ही गोष्ट समोर आल्यानंतर या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालकही धास्तावलेत.
बुधवारी नोएडातल्या अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. ज्या शाळांना सुट्टी नाही, त्या शाळेतल्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवणंच योग्य समजलं. त्यामुळे, बुधवारी अनेक शाळा ओसाड पडलेल्या दिसल्या.
– अशीच भीती सेक्टर ५० मध्ये राहणाऱ्या सुनीता यांच्या चेहऱ्यावरही दिसली. वर्गातून मध्येच त्यांनी आपल्या मुलाचा हात पकडून बाहेर आणलं… आणि रडतच आपल्या घरचा रस्ता धरला.
– सेक्टर १६८ मध्ये राहणाऱ्या अमित आपल्या ऑफिसला न जाता मुलाला घेण्यासाठी शाळेत दाखल झाले. दहशत काय असते हे त्यांच्या डोळ्यांतून दिसत होतं. तिथूनच त्यांनी आपल्या पत्नीला फोन लावला आणि आपला पाल्य सुखरुप असल्याची माहिती दिली.
यावेळी, अनेक पालक मास्क लावूनच शाळेत दाखल होत होते. करोनाग्रस्त पालकाची मुलं या शाळेत शिकतात हे समजल्यानंतर क्षणभर त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती… आणि त्यांनी तडक आपल्या पाल्यांच्या सुटकेसाठी शाळा गाठली. सकाळी ११.०० वाजल्याच्या सुमारास शाळेकडून या पालकांना करोना व्हायरसच्या संशयित प्रकरणाची सूचना मिळाली होती.
या शाळेत आज काही परीक्षाही होणार होत्या. त्या रद्द करण्यात आल्या. इयत्ता १० वीच्या मुलांचा गणिताचा पेपर होता. त्यामुळे या मुलांना परीक्षेसाठी मास्क पुरवण्यात आले. आता पुढचे तीन दिवस या शाळेच्या परिसरात आणि बसमध्ये सॅनिटायझेशनचं काम सुरू राहील.
