रिक्षातील तरुणीला पाहून अश्लिल वर्तन

रिक्षाचालकाने प्रवासी तरुणीकडे पाहत अश्लिल वर्तन केल्याची घटना गोरेगाव परिसरात शनिवारी घडली. याबाबत या तरुणीने ट्विटरद्वारे तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

गोरेगाव येथे राहणाऱ्या या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून रिक्षा पकडली. ती रिक्षात बसल्यापासून संबंधित चालक तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. सुरुवातीला तिने याकडे काणाडोळा केला. मात्र सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम ते एमटीएनएल सिग्नल गोरेगाव पश्चिम यादरम्यान रिक्षाचालक तिच्याकडे पाहून अश्लिल वर्तन करू लागला. यामुळे घाबरलेली ही तरुणी रिक्षातून उतरली व तिने रिक्षाच्या क्रमांकासह मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर तक्रार केली. या तक्रारीची त्वरित दखल घेत पोलिसांच्या ट्विटर टीमकडून ही माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. सीसीटीव्ही फूटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले. सोमवारी या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *