करोना’ विषाणूच्या उद्रेकाचे केंद्रस्थान असणाऱ्या वुहान शहरामध्ये संसर्गाला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून त्यामुळे अन्नपाणी, औषधे घरपोच मिळविण्याचे मोठे दिव्य त्यांना पार पाडावे लागत आहे. काही घरांमध्ये अन्नपाण्याचे साठे संपू लागले आहेत. वृद्धांना औषधे आणि बालकांना दूध मिळणेही दुरापास्त होऊन बसले आहे.
विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये गुरुवारी आणखी ४४ जणांचा मृत्यू झाला आहे; तर ३२७ बाधित रुग्ण आढळले आहेत. यानंतर चीनमधील एकूण बळींची संख्या २७८८ एवढी झाली आहे. डिसेंबरमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर चीनने वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर परिस्थिती एवढी गंभीर झाली नसती, अशी टीका तज्ज्ञांकडून केली जात आहे.
गुरुवारच्या बळींपैकी ४१ मृत्यू हुबेई प्रांत आणि वुहान शहरातील आहेत, दोन बीजिंगमधील तर एक शिनजियांग येथील आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या चीनच्या मुख्यभूमीत ७८,८२४ एवढी झाली आहे.
