प्रेयसीची हौसमौज पूर्ण करण्यासाठी ‘तो’ करायचा घरफोड्या, चोरीच्या ठिकाणाहून पाठवायचा सेल्फी

सांगलीमध्ये पोलिसांनी घरफोड्या करणाऱ्या एका चोराला अटक केली आहे. या चोराला अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीमुळे पोलिसही चक्रावले आहेत. इस्लामपूर पोलिसांनी अटक केलेला हा चोर आपल्या प्रेयसीची हौसमौज पुरवण्यासाठी, तिला खुश ठेवण्यासाठी घरफोड्या करायचा अशी माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्गावर एकदम फिल्मी स्टाइल पाठलाग करुन पोलिसांनी या घरफोड्या करणाऱ्या दरोडेखोराला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव कुणाल शिर्के असं आहे. कुणाल हा अट्टल दरोडेखोर असून पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडे ८२ हजारांची रोख रक्कम सापडली. बंगळुरु महामार्गावर अगदी चित्रपटातील एखाद्या साहसदृष्याला साजेश्या घटनाक्रमाप्रमाणे पोलिसांनी कुणालचा पाठलाग केला आणि त्याला ताब्यात घेतले. “चोरी केल्यानंतर मी माझ्या प्रेयसीला चोरी करतानाचा किंवा ज्या ठिकाणी चोरी केली आहे त्या ठिकाणावरुन सेल्फी फोटो काढून पाठवत असे,” अशी कबुली कुणालने पोलिसांना दिली.

रविवारी पहाटेच्या सुमारास शहरामध्ये गस्त घालणारे पोलीस हवालदार किरण मस्के आणि आलमगीर लतीफ यांना कुणालवर संक्षय आल्याने त्यांनी त्याचा मोटरसायकलवरुन पाठलाग केला. पोलिसांनी कुणालला ताब्यात घेतल्यानंतर त्याने कामेरी येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. कुणालकडून पोलिसांनी ८२ हजारांची रोख रक्कम, घरफोडीचे साहित्य ताब्यात घेतलं आहे.

पोलिसी खाक्या दाखवल्यावर कुणालने इस्लामपूरमध्ये सात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. इस्लामपूरबरोबरच सातारा सांगलीमध्येही अनेक ठिकाणी कुणालने घरफोड्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. सध्या पोलीस कुणालची चौकशी करत असून अजून अनेक घरफोड्यांचा खुलासा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लवकरच कुणालने चोरी केलेला मुद्देमाल आम्ही ताब्यात घेऊ असा विश्वास पोलीस उप-अधीक्षक कृष्णा पिंगळे आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी व्यक्त केला आहे. न्यायालयासमोर कुणालला सादर करण्यात आले त्यावेळी त्याला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *