अरेच्च्या! १०५ व्या वर्षी आज्जीबाईंनी दिली चौथीची परीक्षा!

माणूस आयुष्यभर विद्यार्थीच असतो, शिक्षणाला वय नसतं हे आपण आजवर अनेकदा ऐकलं असेल. पण केरळमधल्या एका आज्जीबाईंनी हे तत्व पूर्णपणे अंगीकारलं आहे. थोडंथोडकं नव्हे, तर वयाच्या तब्बल १०५व्या वर्षी या आजीबाईंनी चौथीची परीक्षा पास केली आहे. आणि त्या नुसत्या पास झालेल्या नसून त्यांना ७४.५ टक्के म्हणजेच डिस्टिंक्शन मिळालेलं आहे. त्यामुळे केरळमधील त्या सर्वात वयस्कर विद्यार्थी ठरल्या आहेत. भागीरथी अम्मा असं त्यांचं नाव असून त्या केरळच्या कोल्लम जिल्ह्यातल्या पाराकुलममधील रहिवासी आहेत. त्यांना ६ मुलं आणि १६ नातवंडं आहेत! पुढच्या पिढीसाठी आणि समाजासाठी देखील भागीरथी आज्जींचं शिक्षणप्रेम आदर्शच ठरावं!

अम्मांच्या जिद्दीला सलाम!

भागीरथी अम्मा ९ वर्षांच्या असताना म्हणजेच तिसरीत असताना त्यांना शाळा सोडावी लागली होती. घरची परिस्थिती त्यांच्या शिक्षणासाठी योग्य नव्हती. त्यांना त्यांच्या लहान भावंडांची काळजी घेणं जास्त आवश्यक होतं. कालांतराने त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढतच गेल्या. पुढे लग्न झालं आणि त्या संसारात पुरत्या अडकल्या. शिक्षणापासून त्यांचा संबंध पूर्णपणे तुटला होता. पण शिकण्याची त्यांची जिद्द अजूनही कायम होती.

आव्हान लीलया पेललं!

अखेर वयाच्या १०५व्या वर्षी भागीरथी अम्मा यांनी पुढचं शिक्षण घेण्याचा निर्धार केला. केरळ राज्य शिक्षण मोहिमेअंतर्गत त्यांनी अर्ज भरला. नियमित अभ्यास देखील केला आणि परीक्षा दिली. त्यांचं वय पाहाता परीक्षेचा अभ्यास, प्रत्यक्ष परीक्षा आणि त्यात उत्तीर्ण होणं, ही आव्हानंच होती. मात्र, त्यांनी ती आव्हानं नुसती पेललीच नाही, तर त्यात चांगलं यश देखील मिळवलं. २७५ पैकी २०५ मार्क मिळवक भागवती अम्मांनी ७४.५ टक्के गुण मिळवले. भागवती अम्मांनी मिळवलेलं हे यश सध्या केरळमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *