पुण्यात डीएसके ठेवीदाराची आत्महत्या, मुलीच्या लग्नासाठी पैसे मिळत नसल्याने घेतला गळफास

पुण्यात डीएसके ठेवीदाराने आत्महत्या केल्याचं समोर आली आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नासाठी डीएसकेकडे गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार ठरवलं आहे. चौथ्या मुलीचं लग्न करायचं असून त्यासाठी पैसे मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

तानाजी गणपत कोरके यांना एकूण चार मुली असून दोघींचं लग्न झालं आहे. तानाजी कोरके यांनी मुलींच्या लग्नासाठी गावाकडील मालकीची अडीच एकर जमीन विकली होती. यामधून मिळालेले चार लाख रुपये मुलींच्या लग्नासाठी स्वत:च्या नावे तर मोठ्या मुलींच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजार रुपये जावई समीर मोरे यांच्या नावे २०१४ मध्ये डीएसके डेव्हलपर्सकडे गुंतवले होते. २०१७ मध्ये पैसे मिळणं अपेक्षित होतं. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही पैसे मिळाले नाहीत.

तानाजी गणपत कोरके यांनी तिसऱ्या मुलीच्या लग्नासाठी उसने पैसे घेतले होते. मात्र चौथ्या मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. आपल्या आत्महत्येसाठी डीएस कुलकर्णी यांना जबाबदार धरण्यात यावं असंही त्यांनी लिहिलं आहे. चिठ्ठीच्या शेवटी त्यांनी अशी वेळ इतर कोणावरही येऊ नये अशी प्रार्थना मी माझ्या मायबाप सरकारला करत आहे असं म्हटलं आहे. पत्राच्या शेवटी तानाजी कोरके यांनी आपला उल्लेख पुण्यातील सुरुवातीपासूनचा शिवसैनिक असा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *