मुकुंदनगर भागात घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदा साठा करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून १८ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरण्यासाठी वापरण्यात येत होता. भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन व पुरवठा विभागाने संयुक्तपणे गुरुवारी ही कारवाई केली आहे.
सय्यद जिशान आरीफ (वय ३२, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा), जावेद आमीश सय्यद (वय ४१, रा. ख्रिस्तगल्ली, नगर) या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला जीवनाश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुकुंदनगरमधील वाबळे कॉलनीतील आटा ट्रेडिंग कंपनीच्या आवारात बेकायदा सिलिंडरचा साठा ठेवण्यात आला असून या सिलिंडरमधील गॅस वाहनांमध्ये भरण्यात येत असल्याची माहिती शहराचे उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. ही माहिती पुरवठा विभागाला देण्यात आली होती. त्यानुसार भिंगारचे सहायक निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी वाबळे कॉलनी येथे छापा टाकून वाहनांमध्ये गॅस भरताना दोघांना पकडले. एक रिक्षा, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य, १८ गॅस सिलिंडर असा १ लाख ७१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
