अल्पवयीन भाचीवर मामाकडून अत्याचार

अल्पवयीन भाचीवर तिचा मामा वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याची घटना आंबेगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तुषार रघुनाथ गुंजाळ (रा. पेठ बेटवस्ती, ता. आंबेगाव) याला अटक करण्यात आली आहे. तो त्याच्या दहा वर्षांच्या भाचीवर गेल्या काही दिवसांपासून लैंगिक अत्याचार करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिच्या चार वर्षांच्या भावासह आपल्या आजी-आजोबांकडे राहतात. आजी-आजोबा शेतकरी आहेत. ते दिवसभर शेतात काम करतात. याचा गैरफायदा घेऊन आरोपी मामा दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना येऊन भाचीवर जबरदस्तीने अत्याचार करत होता. वारंवार त्याने हे कृत्य केले. घाबरलेल्या भाचीने याबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र, २२ डिसेंबरला तिच्या आजोबांचा मोबाइल घरी राहिला. तिने त्या दिवशी हिंमत करून १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती कळताच पोलिस पाटील सविता माठे, अधिकारी तनपुरे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. त्यानंतर मंचर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी तत्काळ आरोपी गुंजाळला अटक केली आहे. मामा-भाचीच्या पवित्र नात्याला काळे फासणाऱ्या या आरोपीला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *