‘पोलीस’ चिटकवणाऱ्या वाहनांवर कारवाई

खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलीस’ लिहून किंवा पोलीस खात्याचे चिन्ह (लोगो) असलेले स्टिकर लावून मिरवणाऱ्या वाहनचालकांवर ठाणे वाहतूक पोलिसांकडून मंगळवारी कडक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या वाहतूक विभागांमध्ये २८७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५७ हजार ४०० रुपयांचा दंड वसून करण्यात आला आहे.

पोलीस खात्यात कार्यरत नसतानादेखील अनेक वाहनचालक त्यांच्या खासगी वाहनांवर पोलीस खात्याचे चिन्ह असणारे स्टिकर लावून तसेच कारमध्ये पोलीस लिहिलेली पाटी लावून मिरवत असल्याचे वाहतूक पोलिसांना आढळून आले आहे. असे वाहनचालक हे रस्त्यावर वाहतुकीला त्याचबरोबर पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे वाहने उभी करतात, अशा तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळे अशा मुजोर वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यासाठी मंगळवारी ठाणे वाहतूक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहीम राबवण्यात आली.

या मोहिमेमध्ये पोलीस खात्यात कार्यरत नसलेल्या मात्र वाहनांवर पोलीस खात्याच्या चिन्हांचे (लोगो) स्टिकर लावलेल्या आणि कारगाडय़ांमध्ये पोलीस लिहलेली पाटी ठेवलेल्या २८७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये २३७ दुचाकी आणि ५० चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या वाहनचालकांकडून प्रत्येकी दोनशे रुपये याप्रमाणे ५७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

सर्वाधिक कारवाई डोंबिवलीत

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १८ वाहतूक शाखांपैकी सर्वाधिक कारवाई ही डोंबिवली वाहतूक शाखा हद्दीत करण्यात आली आहे. याठिकाणी ‘पोलीस’ स्टिकर लावणाऱ्या ५३ दुचाकींवर कारवाई करण्यात आली. तर दुसरी सर्वाधिक कारवाई ही कोनगाव वाहतूक शाखा परिसरात झाली आहे. कोनगावमध्ये ४१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात दुचाकींची संख्या २८ आणि कारची संख्या १३ इतकी आहे.

पोलीस खात्याचे स्टिकर असणारी आणि पोलीस असे लिहलेल्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यासाठी ठाणे पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम हाती घेण्यात येत असते. नागरिकांनी त्यांच्या वाहनांवरील पोलीस खात्याची चिन्हे असलेले स्टिकर आणि कारमधील पाटय़ा या काढून टाकाव्यात. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल. – अमित काळे, वाहतूक पोलीस उपायुक्त- ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *