जुगारात बायकोही हरला, मित्रांनी केला सामूहिक बलात्कार

उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुगाऱ्याने आपल्या पत्नीलाही पणाला लावले. तो जुगार हारल्यानंतर पतीच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेने थेट न्यायलयात धाव घेतल्यानंतर या सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जफराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हे प्रकरण असून आरोपी पतीला दारुचे आणि जुगाराचे व्यसन आहे. अरुण आणि अक्षय या दोन मित्रांबरोबर राहत्या घरी जुगार खेळताना सर्व पैसे संपल्याने त्याने आपल्या पत्नीलाच पणाला लावले. पत्नीला पणाला लावल्यानंतर डाव हरल्यानंतर या व्यक्तीच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या सर्व प्रकाराने हदरलेल्या या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळेच ही महिला स्वत:च्या माहेरी जाऊन राहू लागली. हे सर्व प्रकरण मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घडले आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार ती माहेरी जाऊन राहयला लागली. मात्र तिचा पती सतत तिला फोन करुन घरी परत येण्यास सांगायचा. अखेर ९ डिसेंबर २०१८ रोजी पतीने सासरवाडीला जाऊन या महिलेला पुन्हा असं वागणार नाही असं सांगत तिची माफी मागून तिला परत घरी घेऊन येण्यास निघाला. मात्र वाटेतच त्याने गाडी थांबवून अरुण आणि अनिल या मित्रांना गाडीमध्ये बसवले. या दोघांनी पुन्हा या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसही लक्ष घालत नसल्याने न्यायलयाकडे तक्रार करावी लागत असल्याचे महिलेने याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच आता न्यायलयाने पोलिसांना फैलावर घेत या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायलयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून घ्यावा असा आदेश न्यायलयाने दिला आहे. तसेच गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एफआयआरची एक प्रत न्यायालयात द्यावी असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *