पावसाचा जोर वाढता असताना मुंबईमध्ये लेप्टो, कॉलरा, मलेरिया, डेंग्यू या आजारांचा प्रसार वाढला असून लेप्टो आणि डेंग्यूने जुलै महिन्यात प्रत्येकी एक बळी घेतला आहे. या महिनाभरात स्वाइन फ्लूचे ११३ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीमध्ये हे स्पष्ट झाले आहे.
लेप्टो आणि डेंग्यूमुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. टी प्रभागातील एका ३२ वर्षीय पुरुषाला डेंग्यूची लागण झाली होती, त्याच्यावर खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू होते. तर लेप्टो झालेल्या एन वॉर्डमधील ४५ वर्षीय महिलेवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचाही मृत्यू झाला आहे. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वसामान्यांनी कोणत्याही प्रकारचा आजार अंगावर काढू नये, आरोग्यविभागाने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, असे स्पष्ट केले आहे.
जुलै २०१९ महिन्यातील आजारांची आकडेवारी
आजार- रुग्ण – मृत्यू
मलेरिया ३५१ – ०
लेप्टो ६२ – १
स्वाइन फ्लू ११३ – ०
गॅस्ट्रो ८९४ – ०
डेंग्यू २१ – १
