सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २० ते २५ ग्राहक व कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत आठ जखमींना बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
करमाळा शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र बँकेची ही इमारत आहे. तीन मजल्याच्या या इमारतीत बँकेची शाखा तळमजल्यावर आहे. याच मजल्यावर स्लॅब कोसळला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. जेसीबीच्या मदतीनं ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे.
