परदेशी सरप्राइज गृहिणीला महागात

लंडनवरून फेसबुक फ्रेंडने पाठवलेले सरप्राइज गिफ्ट एका गृहिणीला ३० लाखांना पडले असून परदेशातून आलेल्या पार्सलसाठी विविध प्रकारचे टॅक्स भरण्याच्या नावाखाली तसेच भीती दाखवून भामट्यांनी या गृहिणीकडून पैसे उकळले आहेत. फेसबुक फ्रेंडसह तिघांविरुद्ध नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड पूर्वेकडील शीतलनगरमध्ये ही ४८ वर्षीय गृहिणी राहत असून तिचा पती कंत्राटदार आहे. जूनमध्ये पायलट पॅट्रिक याने पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट गृहिणीने स्वीकारली. सुरुवातीला मेसेजद्वारे संवाद साधता-साधता नंतर दोघेही मोबाइलवर एकमेकांशी बोलू लागले. नंतर पॅट्रिक याने लंडनवरून गिफ्ट पाठवत असल्याचा मेसेज केल्यानंतर महिलेने हे गिफ्ट घेण्यास नकार दिला. मात्र मनापासून मी गिफ्ट देत आहे. त्यामुळे ठेव अशा पद्धतीने पॅट्रिक याने महिलेला भावनिक जाळ्यात पकडले आणि सुरुवातीला गिफ्ट घेण्याविषयी नकार देणारी महिला नंतर मात्र गिफ्ट घेण्यास तयार झाली. त्याचदरम्यान दिल्ली कस्टम ऑफिसमधून महिलेला फोन आला. लंडनमधून आलेले पार्सल घेण्यासाठी २१ हजारांची मागणी महिलेकडे केली आणि येथून ही महिला फसवणुकीच्या जाळ्यात अडकली. महिलेने तत्काळ पैसे बँक खात्यात वर्ग केले. त्यानंतर गिफ्टसाठी महिलेकडे पैशाची मागणी चालू होती. इंटरनॅशनल मनी मॉनेटरी फंड, युनाटेड नेशन अँटी टेरीरिस्ट फंड क्लीरिअन्स आदी विविध नावाने प्रमाणपत्र पाठवत महिलेला भीती दाखवली. आणि महिलेकडून तब्बल ३० लाख २४ हजार ४४७ रुपये उकळले. या फसवणुकीप्रकरणी महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत गुरुवारी पॅट्रिक याच्यासह तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *