फूटपाथवरील १४२ रहिवाशांना घर

मुंबई सेंट्रल येथील मॉरलॅण्ड रोड, मौलाना अब्दुल कलाम आझाद रोड, पीरखान स्ट्रीट आणि मराठा मंदिर परिसरातील फूटपाथवर ४० वर्षांपासून राहत असलेल्या सुमारे १४२ रहिवाशांना आता हक्काचे घर मिळणार आहे. या रहिवाशांना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांच्या हस्ते महात्मा गांधी पथक्रांती योजनेअंतर्गत गुरुवारी घरांचे देकार पत्र (अॅलॉटमेंट लेटर) देण्यात आले.

या परिसरात फूटपाथवर एकूण ५१७ झोपड्या असून, घर लहान असल्याने त्यांनी अर्धा संसार रस्त्यावरच थाटला होता. दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या मार्गावर असलेल्या या झोपड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे या झोपड्यांतील रहिवाशांना महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत घरे देण्याचा प्रयत्न समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी केला होता. दोन वर्षांच्या प्रयत्नानंतर त्यास यश आले आहे. पहिल्या टप्प्यात २३० रहिवाशांची घरासाठीची पात्रता निश्चित झाली आहे. पैकी १४२ रहिवाशांना देकार पत्र देण्यात आले आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रहिवाशांची घरांची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *