चोराने घरात घुसून १४ महिन्याच्या चिमुकलीचा हत्या केली, पालकांचा दावा; पण पोलिसांना संशय

नाशिकमध्ये १४ महिन्याच्या चिमुरडीची हत्या झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. बालिकेच्या गळ्याभोवती धारधार शस्त्राच्या जखमा असल्यावरून बालिकेचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या एकाने आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा पालकांनी केला आहे. मात्र पोलिसांना हत्येविषयी संशय आहे. बालिकेचा मृत्यू झाला असून तिच्या मानेभोवती जखमा आढळून आल्या आहेत; मात्र प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्वरा मुकेश पवार असं मृत चिमुकलीचं नाव असून नाशिकमधील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलाय. वडील मुकेश पवार हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून नोकरीस आहे. दरम्यान, बालिकेची आई योगीता मुकेश पवार यादेखील जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वराच्या आईच्या सांगण्यावरुन वडील मुकेश पवार यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. अज्ञात चोरटा चोरीच्या उद्देशाने चाकू घेऊन घरात शिरला होता. त्याने आपल्या मुलीच्या गळ्यावर घरात असलेल्या ब्लेडने वार केल्याचा दावा, पालकांनी तक्रारीत केला आहे. मात्र, प्रथमदर्शनी ही घटना संशयास्पद असून पुढील तपास पोलीस करत असल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *