स्वत: पोलीस अधिकारी असल्याचं भासवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनीअटक केली. या महिलेसोबतच तिच्या प्रियकरालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे महिलेला बोगस पोलीस म्हणून वावरता यावं यासाठी प्रियकरानं स्वत:च्या पत्नीचा गणवेश चोरला होता. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
चोरीच्या आरोपाखाली दोघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक करण्यात आलेली महिला पोलीस असल्याचा बनाव करायची. पोलिसी गणवेश घालून ती लोकांना लुटत होती. धक्कादायक बाब म्हणजे, या महिलेला तोतया पोलीस होण्यासाठी तिच्या प्रियकरानंच मदत केली. त्यासाठी त्यानं स्वत:च्या पोलीस पत्नीचा गणवेश आरोपी महिलेला दिला होता. अटकेत असलेल्या प्रियकराची पत्नी मध्य प्रदेश पोलीस दलात कार्यरत आहे. पोलिसांनी आरोपी महिलेकडून खोटं ओळखपत्र ताब्यात घेतलं आहे. सध्या पोलिसांनी अटकेत असलेल्या दोघांची ओळख उघड केलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
