आणखी एका आमदाराचा राजीनामा, कुमारस्वामी सरकार अल्पमतात?

कर्नाटकातील एचडी कुमारस्वामी सरकारवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. कुमारस्वामी मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला. नागेश हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ (विधानसभा अध्यक्ष सोडून) होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल, असं सूत्रांनी सांगितलं. तसेच १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाले नसले तरी कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्यासारखीच परिस्थिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

कुमारस्वामींची खुर्ची दहा दिवसात जाणार

दरम्यान, काँग्रेसने या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले असून या आमदारांनी राजीनाम्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत कुमारस्वामी यांचं सरकार कोसळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. १२ जुलै ते २६ जुलै दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यासाठी कुमारस्वामी यांचे प्रयत्न आहेत. मात्र राज्यपाल वजूभाई वाला यांनी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यास कुमारस्वामी सरकारचे सर्व प्रयत्न पाण्यात जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *